ओळखा रेशीम प्रथिन “सेरीसीन’ची उपयोगिता

रेशीम कोष शिजविणे व धागानिर्मिती प्रक्रियेत सेरीसीनसारखा मौल्यवान घटक पाण्याद्वारे वाया जातो. या सेरीसीनला वेगळे करण्यासाठी विविध पद्धतींचा किंबहुना, व्यावसायिक प्रक्रियेचा/ तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे रेशमापासून धागा व पुढे कापड निर्मितीपुरताच सेरीसीन (24-28 टक्के) मर्यादित न राहता जे कोषात उपलब्ध असते तेही वाया जाणार नाही. त्याद्वारे सौंदर्यप्रसाधने, औषधे निर्मिती उद्योगांना या मौल्यवान जैव प्रथिनांची उपलब्धता होऊन कोषांना वाढीव दर देता येईल. तंत्रज्ञान विभाग, विद्यापीठे आणि संशोधन संस्था/ संशोधकांनी या विषयाकडे तितक्‍याच गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

 

देशात 1,25,000 मे. टन रेशीम कोषांची निर्मिती होते. ज्यामध्ये 94 टक्के मोठ्या प्रमाणात सेरीसीन देणाऱ्या बहुबार जातीच्या कोषांचा समावेश आहे. सेरीसीनचा विविध उद्योगांतील महत्त्वपूर्ण उपयोग पाहता त्याचे व्यावसायिकदृष्ट्या धागानिर्मिती केंद्रात कोष शिजविणे, धागा काढणे या सर्व प्रक्रियांमध्ये सेरीसीन जेवढे वाया जाते, ते परत मिळविण्यासाठी जागतिक औद्योगीकरणात त्याचे कोणतेही महत्त्व लक्षात घेतले गेले नाही किंवा याबाबत फारशी जागृती असल्याचेही दिसून येत नाही.

सौंदर्यप्रसाधने आणि औषधनिर्मिती कारखान्यासाठी सेरीसीनचे असणारे महत्त्व, त्याची किंमत, मूल्यवर्धन आणि देशाची असलेली क्षमता याचा विचार करता उद्योजकांनी औद्योगिक स्तरावर सेरीसीनची निर्मिती आणि त्याचा वापर करण्यासाठी पुढे आले पाहिजे. सध्या रेशीम धागानिर्मिती केंद्रात आणि कापड निर्मिती पूर्वी डिगमिंग प्रक्रियेत हजारो टन, कित्येक कोटी रुपयांचे अत्यंत मौल्यवान जैव प्रथिन सेरीसीन वाया जाते. वाया जाणारे सेरीसीन वेगळे करण्यावर भर देणे आवश्‍यक आहे.

 

अळीच्या रेशीम ग्रंथीमध्ये तयार होते रेशीम
धागानिर्मिती आणि डिगमिंग प्रक्रियेमधील टाकाऊ पाण्यातून अत्यंत उपयोगी सेरीसीन मिळू शकते. रेशीम अळी तिच्या विशिष्ट प्रकारानुसार जसे तुती, एरी, टसर आणि मुगा विविध झाडांची पाने खाऊन रेशीम तयार करते. रेशीम हे अळीच्या रेशीम ग्रंथीमध्ये तयार होते. अळीच्या पोटात दोन रेशीम ग्रंथी असतात. रेशीम ग्रंथीची दोन्ही टोके तोंडाजवळ “स्पिनरेट” छोट्या सुईसारख्या भागाला मिळतात. रेशीम अळी पूर्ण वाढ झाल्यानंतर पाने खाणे थांबविते आणि ग्रंथीत तयार झालेले द्रव स्वरूपातील रेशीम द्रव स्पिनरेट या अतिसूक्ष्मावाटे बाहेर टाकते. द्रव स्वरूपातील रेशीम बाहेर येताच त्याचा हवेशी संपर्क येतो आणि त्याच द्रवरूपी रेशीमचा अत्यंत मुलायम असा रेशीम धागा बनतो. रेशीम अळी हा धागा रेशीम कोषांच्या स्वरूपात बनविते. अळीच्या जातीनुसार रेशीम धाग्याची लांबी 500 मीटर पासून 1500 मीटर तर त्याची जाडी दोन डेनिअरपासून आठ डेनिअरपर्यंत असते.